हातावरच्या सरल्या गझला
रेषांसम ह्या ठरल्या गझला
ह्या हृदयीच्या कुरणावरती
झाल्या गायी ... चरल्या गझला
ती गेल्यावर श्रावण आला
डोळ्यांमधुनी झरल्या गझला
मी सापडलो, गठलो नाही ..
..त्यांनी माझ्या धरल्या गझला
जे बुडवाया आले होते,
तेही बुडले... तरल्या गझला
ही मैफल की भरला अड्डा...!
मी माझ्या आवरल्या गझला
असताना मी पुसले नाही..
..गेल्यावर वापरल्या गझला
यमदूताने केला दावा
"..दिवसांहुनही भरल्या गझला.."
जेथे कोणी जातच नाही
तेथेही वावरल्या गझला
काळाच्या आघातासरशी
पडल्या..पण सावरल्या गझला
मायमराठी रसिकांच्याही
प्रेमाने बावरल्या गझला
प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा