शुन्य शुन्यातुन वजा

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

मारल्या गप्पा स्मशानी अन निघाली माणसे
शुन्य शुन्यातुन वजा झाले म्हणाली माणसे


एक पुटपुटला म्हणे गेलाय का नक्की बघा...
चांगली सुस्तावता अस्वस्थ झाली माणसे


'गझल, मदिरा, आसवे, अनुपस्थिती नशिबी तिची'
द्यायला खांदा मला ही चार आली माणसे


"या न पिंडाला शिवा", पिल्लांस बोले कावळा
"शिवत होती बाटग्याला काल साली माणसे"


जन्मभर आली करत जी कोतवाली माणसे
काळ येता सत्वरे शेपूट घाली माणसे


"हे कधी घडलेच नाही, काय हे?" तिरडी म्हणे
"ठेवले सजिवास वर, निर्जीव खाली माणसे"


काल हाडाच्या कवीला जाळले त्वेषामधे
आजे हाडे ढापण्याला परत आली माणसे 




 


 

गझल