सुरेश भटांच्या त्या दोन ओळी...

अजय अनंत जोशी - ⏱ ४ मिनिटे

sureshbhat.in या संकेतस्थळावर मला जवळपास दोन वर्षें होतील. सुरेश भट आणि त्यांच्यासंबंधी बर्‍याच गोष्टी वाचायला - अभ्यासायला मिळाल्या. केवळ रदिफ-काफिया घेऊन गझल करता येत नाही. त्यातील बाह्यतंत्र आणि आंतरिक तंत्र या दोनही गोष्टींवर चर्चा ऐकायला/वाचायला आणि अर्थातच करायला मिळाल्या. सुरेश भटांचे काव्य हे गझलकारांना एक प्रेरणास्त्रोत असते हे अनुभवायला मिळाले. गझल कशी करावी या बरोबरच त्यातील भाव कसा उलगडावा हेही शिकायला मिळाले. तसे, शिकविणारे अनेक भेटले पण इथे मिळाले ते भावले.
सुरेश भटांचे काव्य गझलकारांसाठी उपयुक्त आहे असे नेहमीच ऐकले. अनेक कवी/साहित्यिक यांच्या तोंडून सुरेश भटांचे नाव गझलसाठी जोडले गेलेले ऐकले/पाहिले. गझल केवळ एक काव्यप्रकार नसून त्यात असणारी जी अफाट शक्ती ती मात्र खूपच कमी अभ्यासकांच्या तोंडून ऐकायला मिळाली. मराठी गझल आणि उर्दू गझल यांची तुलना करताना मराठी गझलने असे करावे/ तसे करावे असे मौलिक संदेश ऐकायला मिळाले. एकूण काय, तर मराठी गझलमधे फारसा अर्थ नाही. काही काळ मलाही ते खरे वाटत होते. मात्र, मी sureshbhat.in या संकेतस्थळावर लिहितो हे जेंव्हा मी माझ्या माहितीतल्या एक दोघांना सांगितले तेंव्हा मला त्यांनी या दोन ओळी ऐकविल्या आणि थांबले. गझलशी काहीही संबंध नसलेल्या आणि स्वतः कविता लिहित नसलेल्या लोकांकडून हे ऐकल्यामुळे मला प्रथम धक्काच बसला, नंतर आनंदही वाटला. कविवर्य सुरेश भटांनी मराठी लोकांच्या हृदयात पक्के स्थान मिळवले असल्याची जाणीव झाली. या दोन ओळींबद्दल मीही पुन्हा विचार करायला लागलो आणि याद्विपदीमधील व्यापकता डोळ्यासमोर उभी राहिली. अर्थात, अनेक उदाहरणे देता येतील या ओळींबद्दल पण काहीच देतो....
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

याच त्या दोन ओळी.
या ओळी आपल्या कोणालाच नवीन नाहीत. त्यातील अर्थही फार गूढ वगैरे नाही. पण, सहज-सोप्या वाटणार्‍या या ओळींनी कितीतरी चरित्रे माझ्या डोळ्यासमोर आणून उभी केली. तेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
द्विपदीतील दुसरी ओळ पहा..
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
१. संत ज्ञानेश्वर महाराज : संत ज्ञानेश्वरांचे चरित्र कोणाला माहित नाही? अनेक अन्याय सहन करूनही कोणाबद्दलही मनात किंतु न ठेवता पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाला ही ओळ हुबेहूब जुळते.
२. संत तुकाराम महाराज : संत तुकारांमांनी आयुष्यच जगले ते समाजासाठी! 'आता उरलो उपकारापुरता' असे म्हणणार्‍या संत तुकारामांचे जीवन पाहिल्यानंतर याच ओळीची आठवण होते.
३. संत एकनाथ महाराज : सुसंपन्न स्थितीत असलेल्या संत एकनाथ महाराजांना समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांकडे जाऊन समाजाचा रोष ओढवून घेण्याची तशी खरोखरच आवश्यकता लौकीकार्थाने नव्हती. परंतु, स्वत:चे जीवन जाळून या लोकांसाठी ते खर्च करणार्‍या संत एकनाथांनाही या ओळी लागू पडतात.
४. कुमारील भट्ट : केवळ निवृत्तीवादाचे धडे गिरविणार्‍या समाजाला पुन्हा प्रवृत्तीवादाकडे आकर्षित करणार्‍या कुमारील भट्टांच्या जीवनात असा काही प्रसंग आला की त्यांना स्वतःचे दहन करावे लागले. चितेवर चढल्यानंतरही माणूस प्रवृत्तवादाकडे वळावा असेच ते सांगत होते. एखाद्या विचारासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणार्‍या महापुरुषांमध्ये कुमारील भट्टांचा समावेश होईल. त्यांचे समर्पित जीवन आणि चितेवरच्या प्रसंगाची या ओळी आठवण करून देतात.
५. आद्य शंकराचार्य : कुमारील भट्टांच्यानंतर प्रवृत्तीवादाचा झेंडा आद्य शंकराचार्यांनी उचलला. आपले आयुष्य फार थोडे आहे हे लक्षात आल्यावर ठराविक प्रापंचिक जीवनाची आसक्ती न ठेवता एकदम चतुर्थ आश्रम 'संन्यास' स्वीकारला आणि भारतभर फिरून आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. १६-१७व्या वर्षी संपूर्ण भारत वादविवादामध्ये जिंकणारे आद्य शंकराचार्य मोठेपणा मिरवित बसले नाहीत. पुन्हा गावोगाव फिरले. लोकांना जीवनाचा योग्य मार्ग दाखविला. आपले मोजके आयुष्य भारतासाठी झिजविले. अशांची ही आठवण येते.
६. वेदातील 'यम' : विवाह हा केवळ स्त्री-पुरुषाचा नाही, तर परवंशाच्या स्त्री-पुरुषांचा होवू शकतो. भावा-बहिणींचा नाही हा विचार समाजात रुजविणार्‍या आणि प्रसंगी स्वतःच्या सर्व इच्छा बाजूला ठेवून केवळ नि केवळ याचसाठी आपले जीवन जाळणार्‍या यमाची आठवण या ओळीमुळे होते.
कार्ल मार्क्स, चार्वाक, गौतम बुद्ध, भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवनाचे बलिदान करणारे क्रांतिवीर, छ. शिवाजीमहाराज, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले यांसारखी जीवने, अशी विचारांसाठी/समाजासाठी आपले जीवन जाळणारी अनेक उदाहरणे देता येतील.
मला सांगायचा मुख्य मुद्दा हा की 'माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा' ही लोकोक्ती ठरावी. ज्या ज्या वेळी असे उदाहरण येईल त्यावेळी एक उक्ती म्हणून या ओळीचा वापर नक्कीच होऊ शकेल.
कविवर्य सुरेश भट हा केवळ मराठी मनाचा नव्हे तर काव्यजगताचा मानबिंदू ठरावा अशा या ओळी आहेत.
अमराठी ओळींबरोबरच मराठी ओळींनाही तितकेच महत्व द्यायला हवे. अशा ओळी ही गझलेची ताकद आहे. अशाप्रकारचे काव्य लिहिता येण्याचा प्रत्येक कवीने प्रयत्न करावा.

धन्यवाद!