प्रत्येक शब्द माझा जळती मशाल आहे
प्रत्येक अक्षराचा हेतू कराल आहे
तलवार चालवावी दुसर्या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे
भक्ती स्वतःच करता मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता तुमची कमाल आहे
जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
'परवा' असे 'उद्या' जो, तो आज 'काल' आहे
मदिरा खराब आहे जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला सगळी धमाल आहे
'जाणे तिचे नि येणे' सारे थिजून पाही
दुर्मीळ फार हल्ली 'कातील चाल आहे'
भेटो कितीक येथे पण गीतकार माना
त्यालाच सत्य ज्याच्या श्वासात ताल आहे
हिरवा गुलाल येथे दंग्यास मूळ होतो
पण रंग दोन्हिकडच्या रक्तास लाल आहे
बाजार हा कवींचा, सवलत हजार टक्के
करणार काय सांगा? बकवास माल आहे
चाळीस वर्ष माझी चालू असे परीक्षा
माहीत ना कुणाला 'केव्हा निकाल आहे'
या लोचनात लाली, ओठात धूर काळा
हिरवे विचार, माझा, रंगीन हाल आहे
प्रत्येक शेर माझा खाऊन भाव जातो
कंगाल राहतो मी गिळतो दलाल आहे
तो आठवे जमाना मधुनी उगाच, बाकी...
ती ही खुशाल आहे मी ही खुशाल आहे
झाले जगून ज्याचे सोडून जात आहे
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा