टाहो...

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

घेऊन मी तुला रे सजवीन रात माझी..
पण तू नको विचारू केंव्हाच जात माझी


जेंव्हा कुणा मिळाले ते जातकूळ सारे..
राती अनेक सजल्या सोडून बात माझी


चौकात त्यागला मी.. हा व्यर्थ देह अंती..
तेंव्हा कुठे निघाली ! ...  पहिली वरात माझी


पाठीवरी वळांचे पाहून रंग आता...
कळले कि मीच केली गणना गुरात माझी


जे जे हुशार होते, ते ते पसार होता...
मी ही तयार झाले टाकून कात माझी


माझेच नाव जेंव्हा सा-या मुखांत होते...
पाळेमुळेच तुटली कोलाहलात माझी


गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे...
अन् शांत जगत् झाले विझवून वात माझी

गझल