तसे नसेलही !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

 

...................
तसे नसेलही !
....................

तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !

खऱोखरीच एकरूप जाहलो तुझ्यासवे...
तुझेच  रूप दावती उगाच काय आरसे ?

लपाछपी  मनात या अशी सदैव चालते......
कधी उदास वाटते; कधी प्रसन्न छानसे !

हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?

असेच सांगतोस...वाघ पाहिलास तू जणू...
चुकून पाहिलेस दोन-चार तू म्हणे ठसे !

चुकून  भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !

तुझ्यापरी निलाजरेपणा कुणी करायचा ?
कळे न, वागणे तुला; तुलाच हे जमे कसे !

नसेल तोच अर्थ वा नसेलही तशी छटा...
जरूर मान मात्र तू, कळेल जे तुला जसे !

नको तिथे उगाचच्या उगाच बोललास तू...
मना, असे न यापुढे करून घ्यायचे हसे !

- प्रदीप कुलकर्णी

गझल