तुझा चेहरा
आस लागली जिवास माझ्या केव्हा दिसेल तुझा चेहरा
विरहाचा दुष्काळ संपता कसा उमलेल तुझा चेहरा..
ऋतू आगळे, फुले वेगळी , गंध तयांचा नवीन भासे......
मनात माझ्या आहे तैसा अजून असेल- तुझा चेहरा..?
कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू काही ..तेही मला कळवेल तुझा चेहरा...
अपूर्ण आहे कविता म्हणून तुला टाळले जरी कितीदा ..
खात्री होती मनासारखी ओळ सुचवेल तुझा चेहरा..
तुला पाहता, वारा चळला, मेघ बरसले, कळ्या उमलल्या
उरेल का मज भान जगाचे ..जेव्हा दिसेल तुझा चेहरा..
.....................................................................
हा उंबरठा, कोयंडा अन् कुलुपे होती जागोजागी
तरी राहिला स्वतंत्र - आता जगास नडेल तुझा चेहरा...
शोधुन आलो ,कड्या कपारी ,डोंगर दर्या, आसमंत मी सारा..
(मिळेल का मज ऐसे काही- ज्याने खुलेल तुझा चेहरा ?)
-सोनाली जोशी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा