तुझ्या येण्यामुळे

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

तुझ्या येण्यामुळे घडावे सारखे
तुझ्यावरतीच मी मरावे सारखे

तुझा नव्हतो तशी फकीरी घेतली
अताशा वाटते सजावे सारखे

कुणाचे नावही नकोसे वाटते
तरी हृदयांत का उरावे सारखे ?

तुला भेटून मी किती आनंदलो
असेही वाटले निघावे सारखे

'मिळावी भाकरी' कुणी आक्रोशतो
मरण जगण्यातुनी दिसावे सारखे

चघळतो भाकरी,नसे पाणी तरी..
असे जीवन किती गिळावे सारखे

दिला उद्योग तू मलाही रोजचा
'अता येशील तू..' म्हणावे सारखे

कधी काट्यावरी सुखाने झोपलो
अताशा फूलही रुतावे सारखे

जरी भेटायला किती आसूसलो
तरीही भेटणे नसावे सारखे

गझल