तुझ्याच अंतरी विसावलो

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

विचारतेस का मला कुठून त्रासलो ?
तुझ्याच काळजातुनी हताश परतलो


उडायला नवीन पंख जोड भोवती..
असे म्हणू नयेस तू म्हणून थांबलो


सुखासवे अता कुठे जुळून यायचे..
तरी तुझ्यासवेच अंतरी सुखावलो


जशी मनात वेदना तहानली जरा..
तुझ्याच आसवातले हिशेब प्यायलो


'म्हणून मोकळीच हो ...उशीर का अता?'
तरी 'उशीर होवु दे' मनात बोललो


दुरावलो.. तरी तुला पहायला पुन्हा...
लगेच मी तुझ्याच अंतरी विसावलो

गझल