खुशाली दाखवे ती पण तुझ्या आगीत आहे ती
तिला माहीत नाही की तुला माहीत आहे ती
कसे वागा, जगा, बोला, जगाचे कायदे शिकलो
पुढे चोखाळली मी वाट जी 'शापीत आहे ती'
तिला झालाय पश्चात्ताप पुर्वीच्या धिटाईचा
दमाने आशिकी घे, या गतीला भीत आहे ती
"चुकी माझी न काही" सांगणे वेडेपणा आहे
'तुझ्या झाल्या चुका' म्हणणे जगाची रीत आहे ती
तसाही काळ होता, प्यायचो ठरवूनशी मदिरा
असाही काळ आला की अम्हाला पीत आहे ती
तुझा अन्याय साहे मी ,तुझा धिक्कार भगवंता !
'नराला लाभली ना बाब जी मादीत आहे ती'
न जाणे आवडीनिवडी तिला कळल्या कशा माझ्या?
तसे काहीच ना कारण तरी 'साडीत आहे ती'
तसा येणार नव्हतो मी, म्हणालो "जाउदे, झाले"
"जगावी जिंदगी ही वीत वा दिडवीत आहे ती"
विजेते आजला कोणी, पराजित आजला कोणी
पराजय आज वाटे जो, उद्याची जीत आहे ती
तयारी जायची मातीत माझी होत आली , बस,
सुकावी आसवांची ओल जी मातीत आहे ती !
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा