तू
बोलशी खोटे जरी तू
दे दिलासे मज तरी तू
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू
यातने गोंजारले मी
मागल्यापेक्षा बरी तू
भाग्य भाळी, रेघ हाती
हे खरे का ही खरी तू ?
वेदना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू
धीर दे दु:खास जात्या
सल बनून मित्रा उरी तू
काल ते अन आजचे हे
सांधशील कसा दरी तू ?
तू न राधा, तू न मीरा
हो हरीची बासरी तू
जी क्षणी बदलेल जग हे
बोल गझले, ती परी तू
बघ नको, रस्त्यात भेटू
ये सरळ मरणा घरी तू
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा