ठेवला दडपून ज्यांनी...

गौरवकुमार आठवले - ⏱ १ मिनिट

ठेवला दडपून ज्यांनी नेमका इतिहास माझा
आज त्यांच्या संस्कृतीला होत आहे त्रास माझा

लाभले नाही  महाली सौख्य ज्यांच्या जीवनाला
वाटतो त्यांना सुखाचा मलमली वनवास माझा

लोक ते आता नव्याने लागले बहरावयाला
लाभला ग्रीष्मात ज्यांना श्रावणी सहवास माझा

देह माझा तडफडाया लागतो जेव्हा भुकेने
वाटते सार्‍या जगाला हा असे उपवास माझा

हे कसे स्वातंत्र्य आता लागले मजला छळाया
केवढा रमणीय होता धुंद कारावास माझा

वाढतो आहे तिथे बाजार निर्देशांक त्यांचा
घट्ट होतो भाववाढीचा इथे गळ्फास माझा

योजनेआधीच माझे गाव तंटामुक्त होते
लागला बघ योजनांनी गाव झगडायास माझा

तू नको ज्योतिष्य माझे वर्तवू आताच काही
आजही माझ्या असे हातावरी विश्वास माझा

                                    - गौरवकुमार आठवले
' प्रेरणा ' रो. हौस. क्र. २, पारिजात नगर,
लोखंडे मळा, विठ्ठल मंगल कार्यालयासमोर, जेल रोड,
नाशिक रोड, ४२२१०१ : भ्रमणध्वनी  ९४२३४७५३३६

गझल