वायदे बाजार

अनिरुद्ध अभ्यंकर - ⏱ १ मिनिट




पाहण्याला लोक सारे लोटले
रान शब्दांनी कसे हे पेटले


रोज ठिगळे सांग लावावी किती
रोज हे आभाळ असते फाटले


ह्या सुखाला आज टाळावे कसे
पाहिजे तेव्हा न होते  भेटले

का अशाने देव कोणा पावला
पाय दगडाचे कशाला चाटले


पाळले होते मनाने सोवळे
काल नजरेने तुझ्या ते बाटले

पिंजर्‍यावर प्रेम माझे येव्हढे
पंख ही माझे स्वतः मी छाटले

बदलला मी चेहरा माझा तरी
मांजरागत दुःख मजला खेटले


राख होताना तरी बघण्या मला
तू इथे येशील होते वाटले

वेदनेचा भाव वाढू लागला
वायदे बाजार त्यांनी  थाटले


आसवांची काढली समजूत मी
अन पुन्हा आयुष्य थोडे रेटले




गझल