...विचार एखादा

वैभव जोशी - ⏱ १ मिनिट

असा अचानक समोर येतो विचार एखादा
पुढ्यात यावा जसा जुना सावकार एखादा
 
किती किती जायचे तडे बंद तावदानांना
कुठूनसा शब्द यायचा टोकदार एखादा
 
कधी कधी वाजतात स्फोटांपरी फटाकेही
असेल का त्यातलाच हाही प्रकार एखादा
 
अजूनही सांज व्हायला वेळ केवढा आहे
मिळेल का चेहरा दिवसभर उधार एखादा
 
नभास बिलगून एवढेही रडू नको वेड्या
चुकून जाईल हुंदका आरपार एखादा
 
शरीर वैतागलेच होते जगून आताशा
मनासही पाहिजेच होता नकार एखादा

उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा
 
कधीतरी सूर्य बंड करणार थांबण्यासाठी
किती दिवस राबणार ना कामगार एखादा



गझल