विदूषक

प्रसाद लिमये - ⏱ १ मिनिट

हा बंद ही, यशस्वी, छापा पुन्हा रकाने
आम्हास ही जगू द्या, का बंद कारखाने ?


वेडे कसे तुम्ही हो, अर्धाच वार केला
शोधीन मी तुम्हाला, आता कसा दमाने


आधी मला कळू दे, जे प्राक्तनात आहे
करतोस तू  कशी रे,  ओली सुकी मुक्याने ?


व्हा दूर कुडमुड्यांनो, सांगू नका जराही
काढून ठेवलेले, आधीच पोपटाने


काही थरार नाही, साधे सुधेच सगळे
पाकीट ही लुटावे, साध्याच चोरट्याने ?


डोळ्यात आज पाणी, देतात का चिठोरे ?
वेडाच एक त्याची, फ़ाडून टाक पाने


निर्व्याज हासण्याचा, ध्यानात अर्थ आला
डोळे खरेच ओले, केले विदूषकाने

गझल