विषारी केव्हढे वातावरण आहे

चित्तरंजन भट - ⏱ १ मिनिट

विषारी केव्हढे वातावरण आहे
कसा फुत्कारतो कण आणि कण आहे

तुझे हे शहर तर फिरते मसण आहे
मरणघाईत का प्रत्येक जण आहे

कुणी इथली हवा निर्धोक नासवली
कुणी केले नभाचे अपहरण आहे

जणू वस्तीत लखलखत्या अभावांच्या
सनातन चालला अंधारसण आहे

कधी बळकावणे जमलेच नाही तर
इथे विधिवत सुरू सीताहरण आहे

मशागत तू कशी केलीस जमिनीची
इथे तर माजले नुसतेच तण आहे

भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे

क्षणी एका उभे आयुष्य उलगडते
जणू आयुष्य म्हणजे एक क्षण आहे

पुन्हा गल्ल्या जुन्या चाळून बघतो मी
कुठे ती हरवलेली आठवण आहे

तुझ्या तर चेहऱ्यावरती चरा नाही
अरे हा आरशावरचाच व्रण आहे

गझल