विवंचना

शैलेश कुलकर्णी - ⏱ १ मिनिट



देव समजू लागलो जेव्हा मला मी, मजपुढे कित्येक मोठे पेच होते...
देह सोन्याचा जरी झालाच अर्धा , पाय हे अद्याप मातीचेच होते !!


काम भलत्याचेच, भलत्याच्या बढाया, किर्र अंधारात वाटा दाखवाया
श्रेय सगळे यद्यपि गेले दिव्याला, पेटण्याचे शौर्य वातीचेच होते !!


देह म्हणतो,"चोचले पुरते न झाले", मन म्हणे," आले, मला वैराग्य आले"
वाटते, तुटणार मी,तुटणार आता, रोज ही ऐसीच खेचाखेच होते !!


का उशीरा होईना, मजला कळाले, रूढ झाले वागण्याचे ठोकताळे...
पाप होते पुण्य केल्यानेच आता, पुण्य आता पाप केल्यानेच होते !!


एक कुणब्याचे उभे वाफे जळाले, ती न माझी राहिली ,मजला कळाले
दोन ह्या घटना जरीही भिन्न होत्या, दु:ख दोघे एक जातीचेच होते !!


...शैलेश कुलकर्णी



गझल