व्यर्थ

आभाळ - ⏱ १ मिनिट


इथे जीवनाचे दिवाणे हजारो
अधाशी मनाचे बहाणे हजारो


कवीच्याच माथी अशी रेष वेडी
जिला वाचणारे शहाणे हजारो


तुझे ओठ पोरी किती लाल झाले!
कधी चुंबिले तू उखाणे हजारो?


पुन्हा हात माझाच धरलास का तू?
मला लोक पुसती घराणे हजारो


उगा माणसांची नको खूण शोधू
गवसतील पत्थर पुराणे हजारो


जरी हुंदक्यांनी कुचेष्टाच केली
तरी गायले मी तराणे हजारो


नसे एकटा मी जगी एकटा जो
असावेत माझ्याप्रमाणे हजारो


उपाशीच तुटल्यावरी चोच माझी
कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो?





 


गझल