येतात सोबती हे भेटायला मला..
की कावळेच येती टोचायला मला?
निघणार धिंड माझी, थोडाच वेळ बाकी
येतील दोस्त माझे सजवायला मला!
मी राहतो तिथे, त्या वठल्या तरूतळी
नेतील तोडुनी ते जाळायला मला!
आहे विखूरलो मी आता दिशांत दाही
येऊ नकोस तूही वेचायला मला!
मी छेडल्या सुरांना टाळून सर्व गेले
का थांबलीस मग तू ऐकायला मला?
मी घोट पाण्याचा कुणा मागीतला होता,,
आला समुद्र सारा भेटायला मला!
देतात साथ मजला हे चंद्र सूर्य तारे
गातो निसर्ग गाणी रिझवायला मला!
ते व्यर्थ ग्रंथ सारे, जे आजवरी पढले..
चेहेरा तुझा न जमला वाचायला मला!
जो घाव इथे सोसे, देवत्व त्यास लाभे
पण घाव सोसले तू घडवायला मला!
ह्या कोवळ्या कळ्यांची घेऊन जा शपथ की
येशील परतुनी तू हसवायला मला!
होऊन मोकळी जा माझ्या कवेतुनी, दे..
संभार कुंतलांचा गुंतायला मला!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा