पापणी

कौतुक शिरोडकर - ⏱ १ मिनिट


बोलताना तू अशी झुकविते का पापणी ?
भाव डोळ्यातील ते, लपविते का पापणी ?

चांदण्यांची सावली, भेट तेथे आपली
आठवण माझीच ती, झुलविते का पापणी ?

कोणता हा सल सखे, जाळतो तव अंतरा
शब्द ही ओठी नसे, हरविते का पापणी ?

आजही पाऊस तो, थांबता दारी तुझ्या
लावताना दार तू, भिजविते का पापणी ?

सोबतीस पुन्हा उभी, याद माझी बोलकी
पाहताना एकटक, हलविते का पापणी ?

जाहलो बरबाद मी, गाव सारे जाणते
बिंब ते नयनी नको, विनविते का पापणी ?

दर्द गझले तू दिला, हा तुझा मोठा गुन्हा
लाज त्याची ती मनी, अडविते का पापणी ?


गझल