जीवन विनोद आहे

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

आलेय मूल्य माझ्या येथे नसायलाही
शोधायचो सबब मी तेव्हा असायलाही

सारे हुषार आता बेरोजगार झाले
माणूस पाहिजे ना कोणी फसायलाही

ढकला उद्यावरी जो संकल्प सोडला तो
'मदिरागृहात जाऊ नुसते बसायलाही'

माझी जरूर लागे "वा, वा" म्हणायलाही
मैफील संपली की फरश्या पुसायलाही

बिलगे हवा तशी ती, जगवे हवा तशी ती
आणी हवेप्रमाणे आहे दिसायलाही

रुसली बघून पुर्वी मनवायचो किती मी
मनवावयास लागे आता रुसायलाही

"जीवन विनोद आहे" मृत्यूस मी म्हणालो
"आले कधीच नव्हते इतके हसायलाही"

 

गझल