आता पुरे टवाळी - सुनेत्रा सुभाष

सुनेत्रा सुभाष - ⏱ १ मिनिट

आता पुरे टवाळी इतुकी न स्वस्त बाई
जोडेल शुद्ध नाती लावेल शिस्त बाई

 

अबला कशास म्हणता? आहे बला खरी ही
लपले बिळात त्यांना करणार ध्वस्त बाई

 

उमला मुक्या कळ्यांनो उधळीत गंध अपुला
जपण्यास आत्म निष्ठा घालेल गस्त बाई

 

गर्भातल्या कळीला जर मारशील माते
जननी जरी जगाची होशील फस्त बाई

 

आषाढ वादळी वा वैशाख भाजणारा
धुंदीत श्रावणाच्या जगणार मस्त बाई

 

ठिणगी उरात ज्यांच्या जपणार तेच बाणा
त्यांच्या वरी 'सुनेत्रा' ठेवेल भिस्त बाई


गझल