मोजके

कौतुक शिरोडकर - ⏱ १ मिनिट

आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके


रडवून कोण गेले, हिशोब ना कधी
जपले मनात ओले रुमाल मोजके


अलवार आठवांची अबोल पावले
पिंगा भरात घाली टपाल मोजके


मी टाळतो कितीदा तरी पुन्हा पुन्हा
ये बोलण्यात माझ्या जहाल मोजके


देती मनूकथांचे सदैव दाखले
आहे अजून त्याचे हमाल मोजके


बखरीत नोंदलेले खरे असेल का ?
बोले न शब्द साक्षी महाल मोजके

गझल