वादळ !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

.......................
वादळ !
.......................


लागेलही हवा तो मोती तुझ्या गळाला !
जाईल का परंतू गळ हा तुझा तळाला ?


इतक्यात हा असा का तू गोंधळून जाशी ?
सुरुवात होत आहे इतक्यात गोंधळाला !


येशी तहानलेला होऊन रोज येथे...
वर ठेवतोस नावे तू येथल्या जळाला !


जोडायचे कशाला ताटातुटीत नाते....
कुठल्यातरी पळाशी कुठल्यातरी पळाला ?


डोळे मिटूनसुद्धा बघ या तरूकडे तू...
आली तुझी तपस्या आता कुठे फळाला !


ज्याला कळावयाचे त्यालाच हे कळे की -
काहीच अर्थ नाही बुद्धीविना बळाला !


माझेच हात आता होऊन घाण गेले...
आता किती करावे मी स्वच्छ या मळाला ?


मातीपरी मऊ हो तू रोज रोज थोडा....
समजावतोच आहे मी रोज कातळाला !


या सोसण्यात जेव्हा आयुष्य गाडले मी...
उरलो पुरून तेव्हा माझ्याच मी छळाला !


शून्यापलीकडे त्या माझे-तुझे न काही....
तेथे महत्त्व आहे नुसतेच केवळाला !


आता बघू, किती तू आहेस झुंजणारा...
आलो तुझ्याकडे मी घेऊन वादळाला !


- प्रदीप कुलकर्णी

गझल