फुलांचा रस्ता....

वैभव देशमुख - ⏱ १ मिनिट

पायाशी आला होता धावून फुलांचा  रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा  रस्ता

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा  रस्ता

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली  गोंदून फुलांचा  रस्ता

ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा  रस्ता

(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा  रस्ता)

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....

--वैभव देशमुख



गझल