'ळ' ची जुळवाजुळव

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

पुन्हा विझवा, पुन्हा जाळा, पुन्हा विझवून मन जाळा
किती कामे, तिला विसरा, तिची ती आठवण टाळा

तिचा स्वप्नात येण्याचा भरवसा फारसा नाही
इथे सत्यात अपमानीत व्हा, पुरते वचन पाळा

असेही एरवी वागा जणू कोणीच नाही ती
नि वर झालीच जर नजरानजर तर धाडकन भाळा

कुणाला काय बोलावे तिला शिकवा कुणी आता
"तुझाही रंग आहे एक" म्हणते "यार पण, काळा"

मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा

गझल