प्रेम बर्फासारखे...

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

पावसाने चिकटली माती किती !
घट्ट असुनी निथळली नाती किती !!

प्रेम बर्फासारखे असते, पहा ..
वितळले अन् राहिले हाती किती !

मिळविताना दीप वंशाला तुझ्या ..
तूच बघ रे विझविल्या वाती किती !

पेरता समतास्वरूपी बीज हे ..
उगवल्या खो-यांतुनी जाती किती !

रात्रभर असते मुक्याने साथ जी ..
सोडताना चांदण्या गाती किती !

आज नाही आसमंती चंद्र पण ..
बिगर चंद्राच्या अशा राती किती !

भूतलावरचा भिकारी मागतो-
चित्रगुप्ताच्या वहीं खाती किती !

घाव अजुनी कालचे ओले तरी ..
तळपती नजरेतुनी पाती किती !

अजय अनंत जोशी
९९२३८२०८४२ (पुणे)

गझल