मीच मजला वाहताना पाहिले
जीवनाला संपताना पाहिले
अश्रु होते माझिया डोळ्यांत अन
मी तुलाही स्फुंदताना पाहिले
मी असा बेरंग झालो, ज्या क्षणी
दोस्त माझे रंगताना पाहिले
प्रश्न आला जीवनाचा, अन मला
मीच मजशी तंडताना पाहिले
फाटला संसार माझा हा कधी?
(लक्तरांना लोंबताना पाहिले!)
हाव होती ही भयंकर, त्यांस मी
रक्त माझे शोषताना पाहिले
फाटल्या माझ्या मनाला मी तुला
आज टाके घालताना पाहिले
सर्व दारे बंद झाली ज्या क्षणी..
मांजराला झुंजताना पाहिले
कोण आहे धूर्त इतुका ह्या जगी?
(विश्व सारे गंडताना पाहिले!)
धावलो होतो पुढे, पण मी तुला
पाय माझे खेचताना पाहिले
दु:ख सारे साठलेले हे असे..
बांध फोडुन वाहताना पाहिले
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा