...................
तसे नसेलही !
....................
तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !
खऱोखरीच एकरूप जाहलो तुझ्यासवे...
तुझेच रूप दावती उगाच काय आरसे ?
लपाछपी मनात या अशी सदैव चालते......
कधी उदास वाटते; कधी प्रसन्न छानसे !
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
असेच सांगतोस...वाघ पाहिलास तू जणू...
चुकून पाहिलेस दोन-चार तू म्हणे ठसे !
चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !
तुझ्यापरी निलाजरेपणा कुणी करायचा ?
कळे न, वागणे तुला; तुलाच हे जमे कसे !
नसेल तोच अर्थ वा नसेलही तशी छटा...
जरूर मान मात्र तू, कळेल जे तुला जसे !
नको तिथे उगाचच्या उगाच बोललास तू...
मना, असे न यापुढे करून घ्यायचे हसे !
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा