तुझे चालेल आरामात 'भूषण' ,सोड चिंता तू
न चिंतांची तुला काहीच चणचण, सोड चिंता तू
तुला जे शक्य आहे तेवढे दे अन रिकामा हो
जमाना बैलही मागेल गाभण, सोड चिंता तू
'मगाचा जाब पुसणारा' नसे हा वेगळा आहे
पुन्हा चालेल आता तेच कारण, सोड चिंता तू
मला दररोज किस्मत टाळते, दररोज मी म्हणतो
"तिला आली असावी आज अडचण, सोड चिंता तू"
तुला भीती जयाची तो, पहा आला, पहा आला
पहा गेला, पहा गेलाच तो क्षण, सोड चिंता तू
भटक दुनिया, तुझ्या येतील चिंता मागुनी, त्यांची
जरा होईल यातायात, वणवण, सोड चिंता तू
तुझ्या गालावरी पाऊस, हृदयी पीक अश्रुंचे
तुझा दररोजचा झालाय श्रावण, सोड चिंता तू
कुणी बोचायला येवो, कुणी टोचायला येवो
तुझ्या गझलेतल्या शब्दात दाभण, सोड चिंता तू
जिथे बेडूकवस्ती, ओंडक्याचा होतसे राजा..
तिथे नसतात असले प्रश्न 'का?','पण!" सोड चिंता तू
जराश्या दावणी सोडून दे, चरुदेत त्यांनाही
मनाचे टाक तू काढून झाकण, सोड चिंता तू
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा