नकोच जाऊ तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया
जखमेवरती मीठ चोळूनी खोटेखोटे उगी रडाया
ना अश्रू ते, खारे पाणी तुझ्या स्वतःच्या रडगाण्याचे
मिठागरातुन ठेव भरोनी अळणी भोजन बरे कराया
प्रीती म्हणजे नव्हे मोगरा, गुलाब तो तर काट्यामधला
गाली नाही नेत्री फुलतो ह्रदय घेउनी येच पहाया
तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती मी पण अवघे
शिंपल्यात ती पडतिल कारे होउन मोती मज उजळाया
पुरूष नव्हे मी, प्रकृती आहे स्वाभाविक ते मला आवडे
नार्सीसस चा वसा सोडूनी येशिल का तू इथे रहाया
क्षणात अंबर क्षणात धरती पिसे लागले तुला 'सुनेत्रा'
उतरुन तुझिया डोळ्यामध्ये कसे लागले पहा वहाया
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा