आभास

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?


साधनेची प्रेरणा तो अश्रु होता
म्हणुन वाल्या पात्र वाल्मीकांस झाला


चार पैसे बांधण्या गाठीस कोणी
श्वापदांचा रोजचा मुखवास झाला


आळणी होते तरी केलीच वा! व्वा!!
लंपटांचा बेतही फर्मास झाला


श्वास त्याचे अंतरी रेंगाळले अन्
केवड्याला तेरड्याचा भास झाला


भेटलो अन् हासलो पाहून दोघे
पण तुझ्या त्या वागण्याचा त्रास झाला


शिशिर येता कल्पनेच्या भोव-याने -
हात हाती घेतला, .. मधुमास झाला


गंध कोणा मोग-याचा आवडे पण..
मत्स्यगंधेच्याच पोटी 'व्यास' झाला

गझल