आयुष्याला अमुच्या.......

वैभव देशमुख - ⏱ १ मिनिट

आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले

त्यांच्या तत्वांच्याच नेमके उलटे केले
ज्यांचे ज्यांचे आम्ही येथे पुतळे केले

सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले

पैसा, सत्ता, देहवासना या सार्‍यांनी
नाती प्रीती माणुसकीला कुजके केले

तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो
मी माझ्या सार्‍या देहाचे डोळे केले

कुणीच नव्हते अंधार्‍या रातीला सोबत
मग मी अपुल्या आठवणी॑चे तारे केले

मी रचलेल्या कविता म्हणजे काय आणखी
काळिज सोलुन स्पंदन माझे उघडे केले...........

                    -वैभव देशमुख

 

 

 

 

गझल