थोडासा

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

तसा लगेच संपलो जगून थोडासा
तरी जिवंत राहिलो मरून थोडासा


तिला कळेल प्रेम काय चीज आहे ते
तिचा सराव होउदे अजून थोडासा


प्रवेशतो, सुहागरातची वधू जैशी
हळूच श्वास देह चाचपून थोडासा


कुणास मुफ्त मीठ लागल्यास मी आहे
निघे बरेच, गाल वाळवून थोडासा


तुझा सुगंध लाभला तरी पुरे झाले
तुझा रुमाल फेक वापरून थोडासा


न जन्म नोंदला, न मृत्यु नोंदला माझा
मनात ठेव यार आठवून थोडासा


 



 


 

गझल