तुझी आठवण आली

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट

तुझी आठवण आली



श्रावणधारा.. धरणी भिजली तुझी आठवण आली
खट्याळ वारा पाने हसली तुझी आठवण आली


हिरवळ सजली  तुरे लागले  आनंदाने नाचू
अन् भ्रमराला कळी बोलली तुझी आठवण आली

हत्या, दंगे, जाळपोळ  या  नेहमीच्या बातम्या 
अवचित कानी येता मुरली   ... तुझी आठवण आली


निघून गेला  दिवस  कसा  ते कळले नाही मजला
जशी उन्हे ही  सरू लागली तुझी आठवण आली


दारावरती थाप वाजली.. कंदिल थोडा झुलला
भिंतीवरूनी  छाया  हलली  ..तुझी आठवण आली


काळजात धडधडले माझ्या ..नयनी जमले प्राण
गडगडाट अन् वीज चमकली तुझी आठवण आली


पुढे दरी  ,उंच कडा  मागे... काय करावे आता?
निराशेने सीमा गाठली.. तुझी आठवण आली


कापुसकोंड्याच्या गोष्टीसम हे  दु:खाचे  गाणे
मृत्यूला मी साद घातली तुझी आठवण आली


सोनाली

गझल