तुला भावेल ते सारे मला बोलायचे असते
असे मी बोलते त्यातून तू समजायचे असते
पुरे आता पुरे आता म्हणे याच्याचसाठी मी
तुझे माझे सुखाचे शिखर अजुनी यायचे असते
तुझ्यामाझ्यात राती वाद होतो एवढ्यासाठी
मला झोपायचे नसते तुला जागायचे असते
तुला मी वाढते जेवायला घाईत थोडेसे
तुलाही नेमके जेवण कसे उरकायचे असते?
जिथे काही कमी नाही अशा दुनियेत तू अन मी
मला जे घ्यायचे असते तुला ते द्यायचे असते
'मिटावे ओठ मी' संदेश हादेखील आहे रे
तुला सांगायचे असते, कसे वागायचे असते
तुझा विश्वास असल्यानेच देते साथ मी तुजला
जिथे मज जायचे असते तुलाही न्यायचे असते
उगाचच केस बांधावे उगाचच केस सोडावे
तसे काहीच नाही बस तुला जळवायचे असते
तुझ्या साथीत हे आयुष्य म्हणजे काय ते कळले
कधी जिंकायचे असते कधी हारायचे असते
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा