तू कशी जाशील...?

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

................................
तू कशी जाशील... ?
.................................


तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?


मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?


फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !


नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या !


मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! 


त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !


भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या !


चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या !


प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या !


- प्रदीप कुलकर्णी

गझल