मी मला बजावत होतो! मी तुला विचारत होतो!
मी निघणार्या शंकांना वेळीच सोडवत होतो!
नियतीने माझी इतकी फरपट लिहिलेली होती..
जी माझी नव्हती, मी त्या, वाटेवर चालत होतो!
हा गुंता इतका झाला, ना वीण मला उलगडली
मी जोडुन माझी ठिगळे,मग मलाच उसवत होतो!
"तळपून दीसभर अंती, तव पदरी काय पडले रे?"
मी बुडणार्या सूर्याला हा प्रश्न विचारत होतो!
पाझर फुटण्या इतकाही ओलावा तुझ्यात नव्हता..
मी व्यर्थ शिळेवर माझे डोकेच आपटत होतो!
आतमध्ये कोठेशी का ठिणगी जिवंत होती?
येताच हवेचा झोका, मी पुन्हा फुलारत होतो!
मी गेलेल्या काळाची कधि पर्वा केली नाही..
पण येणार्या काळाचा मी रस्ता निरखत होतो!
नाजूक तुझ्या तळव्याला खुपतील पाकळ्या म्हणुनी
मी पायघड्या ह्रदयाच्या तुजपुढती पसरत होतो!
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा