...वेड पांघरावे मी !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

................................
...वेड पांघरावे मी !
................................


यायचे तुझ्यापाशी़; काय पण करावे मी ?
- की असेच कायमचे सांग अंतरावे मी ?

प्रश्न हा न, कोणाला हे पटेल की नाही...
प्रश्न हा - कशासाठी, काय उत्तरावे मी !

चेहरा तुझा आता आठवे न थोडाही...
आठवे, तुला तेव्हा सारखे स्मरावे मी !

जी घडून गेली ती घोडचूक मी आहे...
अन् स्वतःस थोडेसे रोज निस्तरावे मी !

मी कुठे किनाऱ्यांशी खेळलो मनाजोगे ?
तृप्त व्हायच्या आधी काय ओसरावे मी ?

मारलीस तू बाजी; मान्य हे, तरीसुद्धा-
खेळलोच नाही तर सांग का हरावे मी ?

भोवती किती गर्दी...आतही किती गर्दी....
एकटेपणाखाली रोज चेंगरावे मी !!

आगही; फुफाटाही...भाग्य हेच या भाळी
सांग तू मना माझ्या काय पत्करावे मी ?

लागल्यावरी हाती चांदणी मला माझी
सूर्य-चंद्र-ताऱ्यांचे विश्व ठोकरावे मी !

मैफलीत या गाणे ऐकवून झाले की...
वाजतील टाळ्या अन् त्या क्षणी मरावे मी !

येथल्या शहाण्यांची वाटते मला भीती !
मी दिसू नये त्यांना...वेड पांघरावे मी !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल