गझल माझी तसतशी

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते


फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते


पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते


केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते


काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते


काय या मद्यात जादू कोण जाणे?
घोट जातो आत छाती रुंद होते


का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते


जसजसा जमिनीमधे मी एक होतो
गझल माझी तसतशी उत्तुंग होते


पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते?


 



 


 

गझल