एकरूप

चांदणी लाड. - ⏱ १ मिनिट

जरी सांजवेळी तुज टाळते मी,
उरी आठवांची खुण ठेवते मी.


किती गोड आहे जुलमी सख्या तू,
पहाटे कळ्यांना गुज सांगते मी.


नशा भेटण्याची तुज आकळेना,
मनस्वी तुझा हा छळ सोसते मी.


व्यथा, ठेच कोठे? चटके जिवाला,
मिळाले मला ते वळ मोजते मी.


मला आसरा तू, तुज मी निवारा,
असे छानसे रे घर मांडते मी.


पहा..!! चांदणे अन अनुकूल सारे,
जुन्या जाणिवांचे क्षण मागते मी.


भिडू थेट व्याकुळ नयनांत आता,
इशारे तुझे हासत टाळते मी.


अरे..!! याचसाठी बदनाम झाले,
सख्या रे तुझ्यावर जिव टाकते मी.

गझल