......................................
...वजन एखादे नवे !
......................................
दुःख तू केलेस कोठे सहन एखादे नवे ?
सांग ना तुज का सुचावे कवन एखादे नवे ?
या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आता मला मी गगन एखादे नवे !
झिंग एखादी अशी की, जी कधी उतरू नये...
पाहिजे माझ्या मनाला व्यसन एखादे नवे !
नाव आधीचे तसे जाईल का पुसले कधी ?
नाव तू केलेस कोठे मनन एखादे नवे ?
क्षीणसा आवाज आला जीर्ण कायेतून या -
`पाहिजे मज पांघराया वसन एखादे नवे ! `
उत्तरे मिळतीलही त्यातून तुज काही जुनी ...
घाल तू दुनियेस कोडे गहन एखादे नवे !
शब्द सारे भासती मज मोडकी-पडकी घरे....
पाहिजे अर्थांस माझ्या सदन एखादे नवे !
काय मी मागून आता मागतो आहे तुला ?
मो़डण्यासाठी तरी दे वचन एखादे नवे !!
आजच्या छंदात कविता वाटते हलकी मला...
मी उद्या शोधीनसुद्धा वजन एखादे नवे !
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा