श्वापदांचे ना मुळी ते माणसांचे काम होते
सांडले मी रक्त भरले सोयर्यांनी जाम होते
जाळतांना काल काही मातलेल्या आठवांना
पेटलेल्या आसवांचे मोजले मी दाम होते
ना तिथे बाजार होता ना तिथे होती दलाली
भक्त होता 'तोच' त्याचा 'तोच' त्याचे धाम होते
शोधतो मी सांजवेळी हासर्या त्या माणसांना
गाव ज्यांचे बाटके अन नावही बदनाम होते
चांदण्यांच्या सावल्यांना स्वप्न पडले एक वेडे
झाकला मग सूर्य त्यांनी छेडले संग्राम होते
'वेचले' आयुष्य सारे वादळांशी झुंजतांना
गुंफतांना लक्तरेही ना तसे विश्राम होते
चालल्या 'सेना' बघा या तारण्याला धर्म खोटा
माकडांचे संघ ते, ना त्यात उरले 'राम' होते
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा