चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट

पूर आले ,सोसली मी वादळेही ,वाढलो मी
घाव भरले, पण फळांचा भार झाला वाकलो मी

या जगाच्या कौतुकाने केवढा  आनंदलो मी
 चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

सोडल्याने देश माझी चालली फरफट कधी ची
बाप माझा सांगतो की वैभवाने माजलो मी

घेतले घरदार त्यांनी, घेतले सोने कुणी , पण
राहिली ही माय माझ्या वाटणीला....जिंकलो मी

मानली ना हार केव्हा,   घेतला मी  वेळ थोडा
गप्प होतो, काळ आला योग्य मग घोंघावलो मी

कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात
खेळतांना नातवाला ना कधी रागावलो मी....

-सोनाली जोशी
गझल