...जायचे कुठे ?

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

.................................
...जायचे कुठे ?
.................................


ही दुपार...भरदुपार...जायचे कुठे ?
सावली कुठे न गार...जायचे कुठे ?


सोबतीस पाहिजेच ना कुणीतरी ?
सोबतीविनाच यार...जायचे कुठे ?


संपलीच पावलांमधील चेतना....
घेउनी तुझा नकार...जायचे कुठे ?


`गाव हे अगत्यशील...`सांगतोस तू...
मात्र बंद दार दार...जायचे कुठे ?


एक वाट दाखवेल का कुणी मला...?
मार्ग भोवती हजार...जायचे कुठे ?


जायचे कुठे, तुला कळेल एकदा....
रोज रोज तू पुकार...`जायचे कुठे ?`


व्हायला तयार, वेळ लागतो किती...?
मी तयार...तू तयार...जायचे कुठे ?


यायचे  स्वतःकडेच  शेवटी  पुन्हा...
व्हायचे कुठे पसार...? जायचे कुठे ?


राहिलो तुझ्यावरीच मी विसंबुनी...
...आणि तूच हे विचार...`जायचे कुठे ?`


- प्रदीप कुलकर्णी 


 


 


 


 



 

गझल