अता टाळतो मी, बोलणे कितीदा
कुणी ऐकते का ?..... सांगणे कितीदा
कुठे कोण जाणे, हरवले दिवस ते
मला पाहताना, लाजणे कितीदा
कळे ना कधी ही, वाट खिन्न झाली
इथे वेचलेले, चांदणे कितीदा
"कशी तू ?" तसा हा, होय प्रश्न सोपा
"अशी मी.... " तिचे ते, टोचणे कितीदा
उगा संशयाची , भोवती सुई ती
पुन्हा चाळतो मी , वागणे कितीदा
जरा शब्द ओठी, यायचीच खोटी
पदर आवरूनी , खोचणे कितीदा
इथे जन्म घेते, रोज रोज काही
जुने ते नव्याने, चावणे कितीदा
जरी त्याच भिंती, तेच तेच वासे
फुका हे घरांचे, मांडणे कितीदा
अजूनी फुलांची , आस या मनाला
मनाचे मनाशी , भांडणे कितीदा
रिते हात राहो ओंजळी रिकाम्या
नको ते... नको ते... , मागणे कितीदा
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा