मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी
मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी
अजून सलतो जुनाच काटा जरी कुठे ना फिरले तरी
कुठे छळाचा नसे पुरावा असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी
विझेल अग्नी कधी बरे हा? इथे कुणाची जळते चिता?
(अजून बाकी कसा निखारा शहर कधीचे जळले तरी?)
जगून घेते मनाप्रमाणे सुखास लावेल नजर कुणी
तसे अचानक छळून जाती विचार रात्री कुठले तरी
मनास देते प्रकाश माझ्या अजून आशा तगते इथे..
कुठून येते निराश वारे विषण्ण वादळ सरले तरी
मला नकोशी उमलत जाते मनात माझ्या कविता कधी..
कशी नकोश्या मुलाप्रमाणे बळावते ती कळले तरी .......
- सोनाली जोशी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा