हे शहर माझी व्यथा सांभाळते

प्रसन्न शेंबेकर - ⏱ १ मिनिट


मौन माझ्या सोबतीने पाळते
हे शहर माझी व्यथा सांभाळते

ती उखाणा घेत नाही, हासते
हासुनी ती नाव माझे टाळते

मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते

लोपले पावित्र्य दीपांचे, पहा!
देशद्रोह्यांना प्रजा ओवाळते

पोळलो मी, भाजलो आजन्म मी
ही चिता आहे बरी की ,जाळते

दु:ख ओलांडून जाती माणसे
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते?

रात्र भासे ही मला तुजसारखी
चांदणे वेणीत जेव्हा माळते

गझल