देवळाच्या पायरीवर रोज मजला दिसतो वेडा
'पावला का दगड दोस्ता' रोज मजला पुसतो वेडा
देववेड्या सोवळ्यांची मांदियाळी देवापाशी
भरजरी त्या सोवळ्यांना फाटक्याने हसतो वेडा
सांजवेळी रेकतो मी आरतीची कवने काही
मारव्याची तान घेतो सूर लावत बसतो वेडा
पूर सरता भाविकांचा दर्शनाच्या नुरती रांगा
प्रेमवेगे धाव घेतो, देव दिसता रुसतो वेडा
भंगलेल्या देवळाची बंद होता सारी दारे
'देव आला देव आला' भास होतो फसतो वेडा
शोधता मी आज त्याला पायरीवर नव्हते कोणी
दर्शनांती उमगले मग माझियातच वसतो वेडा
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा