जाहले तारे किती ?

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

भेटलेल्या चांदण्यांना उडविती वारे किती !
पाहिजे होते तयांना नेमके 'घारे' किती ?


सोडुनी शरमेस जेंव्हा घातली जी साद तू..
भेटण्या आतूर मी... पण बंद ती दारे किती !


भक्त मोठा दाविला त्यांनी मला, पण हाय! तो -
मानवाला सोडुनी दगडांस गोंजारे किती !


फासुनी शेंदूर वरती फूलमाळा चढविता...
आंधळ्या-बहिर्‍यासमोरी लावता नारे किती !


लावले जीवन पणाला अमृताला प्राशण्या;
कोण जाणे त्यातले गोडे किती...? खारे किती ?


फेकली अस्त्रें तयांनी भेदण्या तिमिरांस या...
क्षणभरी ती चमकली... पण जाहले तारे किती ?

गझल